औरंगाबाद परिसरांतील अपरिचित 50 पर्यटनस्थळे!

औरंगाबाद जिल्हा हा पर्यटनप्रेमींचा आवडीचा जिल्हा आहे. अजिंठा वेरूळ सारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांचा हा जिल्हा आहे. आपल्यापैकी बहुतेक जणांनी हि पर्यटनस्थळे पाहिलेली असतीलच. पण या प्रसिद्ध पर्यटनस्थळानालीकडेही औरंगाबाद परिसरात आणखीही काही पर्यटनठळे आहेत. या पर्यटनस्थळांचा म्हणावा तास विकास झालेला नाही, पण तरीही हौशी पर्यटकांना हि ठिकाणे नक्कीच आवडतील अशी आहेत. म्हणूनच प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं वगळून काहीशी अपरिचित स्थळं हौशी पर्यटकांसाठी सुचवीत आहे. भटकंतीचाही व्यवसायीक पातळीवर विचार करणार्‍यांनी इकडे फिरकू नये. त्यांचे व्यवसायीक समाधान करण्याची माझी ताकद नाही.

१.शेंदूरवादा : औरंगाबाद पासून वाळूजमार्गे डावीकडे गेल्यास शेंदूरवादा हे खाम नदीच्या काठावर गणेश स्थान आहे. येथेच मध्वमुनीश्वरांचा आश्रम आहे. गावात एक सुंदर विठ्ठल मुर्ती असलेले मंदिर आहे. (मंदिर साधेच जूने लाकडी माळवदाचे आहे)

२. कायगांव टोका : औरंगाबाद नगर रस्त्यावर कायगांव टोका येथे प्रवरा गोदावरी संगमावर सिद्धेश्वर मंदिर आहे. या मंदिरा जवळच इतर पाच मंदिरे आहेत ती सहसा बघितली जात नाहीत. शिवाय याच मंदिराचा नदीकाठ एक भुईकोट किल्लाच आहे. नदीचे पाणी उतरल्यावर घाटाच्या ओवर्‍या पहायला मिळतात.

३. कर्णसिंहाची छत्री : वाळूज मधील गोलवाडी येथे करणसिंहाची छत्री आहे. आठ दगडी कोरीव स्तंभावरची ही छत्री शेतात आहे. फारसे कुणीच इकडे फिरकत नाही. याच करणसिंहाचा एक पडका महाल कर्णपुर्‍यात आहे. देवीच्या मंदिराच्या जवळ जैन मंदिरापासून पुढे गेल्यावर शेतात एक बारव आहे. भाजलेल्या वीटांची ही बारव तीला चार ओवर्‍या आहेत.

४. खंडोबा मंदिर : सातार्‍यात खंडोबाचे मंदिर हे अहिल्याबाईंच्या काळातील आहे. देव दर्शनाला जाताना आपण तिथले स्थापत्य पहातच नाही. एकवेळ केवळ स्थापत्य बघण्यास या मंदिराला भेट दिली पाहिजे.

५. साई मंदिर : देवळाई चौकातून उजवीकडची वाट साई टेकडी कडे जाते. या परिसरांतील कितीतरी ठिकाणं अतिशय निसर्गसंपन्न अशी आहेत. साई मुर्तीच्या अगदी समोरच्या टेकडीवर दर्गा आहे. साई मंदिराच्या मागील भागात अतिशय चांगली जागा वन पर्यटनासाठी आहे. हौशी जंगल पर्यटकांनी जरूर जावे.

६. साई टेकडी घाट : साई टेकडीपासून जरा पुढे गेल्यावर एक छोटासा घाट लागतो. तो परिसर अतिशय रम्य आहे. सिंदोण भिंदोण तलावाच्या परिसरांतही इथून जाता येते.

७. कचनेर : साई टेकडीच्या रस्त्यानीच पुढे गेल्यावर आपण सरळ कचनेर येथे पोचतो. तेथील जैन मंदिर आणि त्यातील मुर्ती इथेही भेट देता येईल.

८. भालगांव : कचनेर पासून मुख्य बीड रस्त्याला लागल्यावर परत औरंगाबादला येताना उजव्या हाताला भालगांव म्हणून एक छोटे गांव आहे सुखना नदीच्या काठावर. या गावात समर्थ रामदासांनी स़्थापन केलेल्या रामाच्या मुर्ती आहेत. जूना वाडा वाटावा असे हे मंदिर आहे.

९. इस्लाम खान मकबरा : औरंगाबाद-जळगांव रस्त्यावर ताज हॉटेल जवळ मौलाना आझाद महाविद्यालयाच्या परिसरांत इस्लाम खान यांचा मोठा मकबरा आहे. त्याची डागडुजी रंगरंगोटी संस्थेने चांगल्या पद्धतीने केली आहे. या मकबर्‍याचे प्रवेश द्वार दक्षिण दिशेला आहे. इतका भव्य आणि सुंदर दरवाजा औरंगाबादेत दुसरा नाही. मुलांच्या वस्तीगृहातून या दरवाजाकडे जाता येते.

१०. जयसिंह छत्री : ताज हॉटेल समोरून डावीकडे वानखेडे नगर कडे जाणारा रस्ता जयसिंहाच्या छत्रीकडे जातो. 32 सुंदर दगडी खांबांवर हीचे छत तोलून धरले आहे. छत्रीच्या तळघरात महादेवाचे मंदिर आहे.

११. हर्सूलची देवी : हे ठिकाणही पाहण्यासारखं आहे. गर्दीचा दिवस टाळून तिथे एखाद्या दुपारी संध्याकाळी गेलं तर हा शांत रम्य परिसर आवडू शकतो. देवीचे मुळ मंदिरही जूने आहे.

१२. हिमायत बाग : ही जागा अगदी जवळ असूनही दूर्लक्षीली जाते. येथील महालाची डागडुजी करून घेतली व कारंजे दुरूस्त केले तर हा परिसर एक बगीचा म्हणून अजून रम्य वाटू शकतो.

१३. सारोळा : औरंगाबाद जळगांव रस्त्यावर चौक्यापासून जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला सारोळा म्हणून पाटी लागते. हे एक छोटे हिलस्टेशन आहे. या जागेपासून दुधना नदीचा उगम होतो. या उंच जागेवरून औरंगाबाद शहराचा विस्तार दृष्टीक्षेपात येतो.

१४. लहूगड नांदरा : चौक्याच्या अजून जरा पुढे गेल्यावर उजव्या बाजूला लहुगड नांदरा अशी पाटी लागते. लहुगड हा एक छोटा किल्ला एकेकाळी होता. आता तिथे एक गुहेतील दगडी महादेव मंदिर आणि वर दगडात कोरलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी टाकं आढळतात.

१५. लिंगदरी : लहुगडाला वळसा घालून तो रस्ता परत औरंगाबादला पळशी मार्गे येतो. हा परिसर अतिशय रम्य आहे. वाटेवर तळं लागते. तसेच लिंगदरी नावाचा धबधबा आणि देवस्थानही आहे.

१६. बालाजी मंदिर बाबरा : फुलंब्रीच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूला बाबरा गावाकडे रस्ता वळतो. या गावात बालाजीचे जूने मंदिर आहे. मंदिराच्या ओवर्‍या, लाकडी खांब, माळवद एकदच चांगल्या अवस्थेत आहे. मंदिराला कमान आणि इतर दगडी बांधकाम राजस्थानी कारागिरांकडून विश्वस्त मंडळी करत आहेत.

१७. औरंगाबाद लेण्या : मकबर्‍याच्या पाठिमागे जाणारा रस्ता पुढे औरंगाबाद लेण्यांकडे जातो. मकबर्‍याला जाणारे खुप आहेत पण औरंगाबाद लेण्यांकडे फारसे कुणी फिरकत नाही. उजव्या बाजूच्या लेण्यात आम्रपालीचे अप्रतिम असे शिल्प आहे. गायन वादन नृत्य असा एकत्रित भारतातील पहिला संदर्भ याच लेण्यात आढळून आला आहे.

१८. गोगा बाबा नविन लेण्या : गोगा बाबा टेकडीच्या पाठीमागे गेल्यावर आता नविन लेण्या सापडल्या असून लोकांनी त्याची साफसफाई केली आहे. ही जागा फार छान असं निसर्गसंपन्न ठिकाण आहे.

१९. सलाबत खान मकबरा : विद्यपीठ परिसरांत साई क्रिडा केंद्राकडे जाताना वाटेत डाव्या बाजूला सलाबत खानाचा मकबरा लागतो. हा मकबरा काहीसा पडक्या अवस्थेत असला तरी मुळ इमारत चबुतरा शाबूत आहे. मकबर्‍याला संपूर्ण चारही बाजूनी संरक्षक भिंत आहे. दक्षिण दिशेला मकबर्‍याचा सुंदर असा दगडी दरवाजा आहे. (ही खासगी मालमत्ता आहे.)

२०. नवखंडा पॅलेस : भडकल दरवाजा जवळची ही वास्तू मलिक अंबरची आठवण सांगते. हा महाल आता काहीसा पडीक अवस्थेत आहे. पण त्याचा बराचसा भाग शाबूत आहे.

२१. भांगसी माता गड : औरंगाबाद दौलताबाद रस्त्यावर दौलताबाद टी पॉईंटपासून डाव्या बाजूचा रस्ता रेल्वे लाईन क्रॉस करून सरळ जातो भांगसी माता गडाकडे. हे ठिकाण देवी ठिकाणा सोबत एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. वरपर्यंत जायला चांगल्या पायर्‍या केलेल्या आहेत.

२२. हमामखाना : देवगिरी किल्ल्याच्या समोर आणि पाठीमागे काही सुंदर ठिकाणं आहेत. त्यातील पहिलं आहे ते किल्ल्यच्या समोर असलेला हमामखाना. ही इमारत बाहेरून पडकी वाटत असली तरी आतून संपूर्ण व्यवस्थीत आहे.

२३. चांदबोधले समाधी : हमामखान्याला लागूनच जनार्दन स्वामींचे गुरू चांद बोधले या सुफी संताची समाधी आहे. चांद बोधले हे हिंदू असून त्यांची सुफी संप्रदायाने कबर बांधली व तिथे दरवर्षी यात्रा भरते. हिंदू संताचा दर्गा असलेले भारतातील एकमेव ठिकाण आहे.

२४. देवगिरी किल्ला तटबंदी : याच परिसरांत किल्ल्याची संपूर्ण शाबूत अशी तटबंदी आहे. तिचे चार मोठे दरवाजे आहेत. हा भाग कधीच पर्यटकांकडून बघितला जात नाही. देवगिरी किल्ल्याकडून खुलताबादला जाताना ज्या दरवाजात नेहमी वाहतूक अडते. त्याला लागून जी तटबंदी आहे तीच्या कडे कडेने फिरल्यास हे चार दरवाजे आढळतील.

२५. हातीमहल- मुसाफिरखाना : देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे हात्तीमहल, मुसाफिर खाना या इमारती आहेत. मुसाफिरखान्याचा वरचा मजला पडलेला असला तरी तळघरसंपूर्ण शाबूत आहे. हातीमहल तर संपूर्ण शाबूत आहे. त्याच्या जीन्यावरून वर गच्चीवरही जाता येते.

२६. रसोई माता मंदिर : देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रसोई माता मंदिर आहे. यादवांचा खजिना सांभाळणारी देवता ‘हिरे माणकांची रास म्हणून ती रसोई माता’ अशी दंतकथा सांगतात.

२७. खुफिया बावडी : देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे केसापुरी रस्त्याला फतेपुर गावाजवळ एका शेतात खुफिया बावडी म्हणून सुंदर दगडी ओवर्‍या असलेली बारव आहे.

८. केसापुरी धबधबा : याच रस्त्यानं पुढे गेल्यावर केसापुरी तांडा गावा जवळ तलाव आहे. शिवाय गावाजवळून पुढे डोंगराच्या दिशेने गेल्यावर केसापुरी धबधबा आहे.

२९. निजामाची कबर : खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारूती सर्वांना माहित आहे. पण या कबरी समोरच असलेल्या बुर्‍हानोद्दीन गरीब दर्ग्यात पहिला निजामाची कबर आहे. हा दर्गा ओवर्‍या ओवर्‍यांचे दगडी बांधकाम असलेला वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.

३०. लाल बाग अरबाज बेग कबर : बुर्‍होनोद्दीन दर्ग्याच्या बाजूलाच लाल बाग नावाची दरवाजापाशी अतिक्रमण केलेला पडलेला बगीचा आहे. त्यात एक पडिक अशी कबर आहे. त्यावरचे रंगकाम अजून बरेच शाबूत आहे.

३१.अरबाज बेग कबर : लाल बागे जवळ कबरस्तान असून तिथे मिर्झा अरबाज बेग या सरदाराची मलिक अंबर कबरीची छोटी प्रतिकृती असलेली सुंदर सुबक कबर आहे. याच कबरीचा दक्षिण दरवाजा एका तलावापाशी उघडतो. हा परिसर अतिशय सुंदर असा बगीचा होवू शकतो.

३२. खुलताबादला वळसा घालून वेरूळकडे जाताना उजव्या बाजूला बनी बेगम बाग लागते. ही वास्तू चांगल्या पद्धतीने जतन केल्या गेली आहे. औरंगजेबाच्या सुनेची इथे कबर आहे. मोठा भव्य दरवाजा यावास्तूला आहे. भक्कम तटबंदी संपूर्ण शाबूत आहे.

३३. जर्जर बक्ष दर्गा : म्हैसमाळ कडे जाणारा रस्ता एका कमानीतून पुढे जातो आणि डाव्या बाजूला खुलता बादचा प्रसिद्ध उरूस ज्यांच्या नावाने भरतो त्या सुफी संत जर्जरी बक्ष यांचा दर्गा आहे. हा दर्गा जून्या वास्तूकलेचा नमुना आहे.

३४. मलिक अंबर कबर : जर्जरी बक्ष परिसरांत मलिक अंबरची सुंदर देखणी कबर आहे. शिवाय अजून 8 छोट्या मोठ्या कबरी आहेत. एक रिकामी कबर पण आहे. शिवाय डोंगरावर उंच एक मस्जिद आहे. ते ठिकाण या परिसरांत सर्वात उंच असे आहे.

३५. आटोमन कबर : खुलताबाद वेरूळ रस्त्यावर डाव्या बाजूच्या डोंगरावर एक तुर्की पद्धतीचा वेगळाच मनोरा दिसून येतो. ही आहे ऍटोमन साम्राज्याचा सुलतानाची कबर. हैदराबादच्या निजामाची सून निलोफर हीच हा पिता. त्याच्यासाठी ही कबर बांधली पण त्याचा मृतदेह इकडे आणता आलाच नाही. हे ठिकाण अशा नेमक्या ठिकाणी आहे की तेथून सर्व वेरूळ दृष्टीक्षेपात येते. या कबरीसाठी खुलताबादच्या शक्कर चटाने का दर्गा इथून एक छोटी वाट जाते. शक्कर दर्गा हे ठिकाण पण पाहण्यासारखे आहे.

३६. परियोंका तालाब सुर्‍हावर्दी दर्गा: खुलताबाद पासून डाव्या बाजूला एक रस्ता शुलीभंजन कडे जातो. या वाटेवर सुफींच्या सुर्‍हावर्दी परंपरेतील संतांचा एक दर्गा आहे. याच दर्ग्याच्या जवळ परियोंका तालाब म्हणून मोठे सुंदर तळे आहे. याच दर्ग्याच्या परिसरांत अंगणात एक स्वयंभू महादेव शाळूंका आहे. तिचीही नियमित पुजा होत असते.

३७. शुलीभंजन : या ठिकाणी नाथ महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली असे सांगितले जाते. हे एक छान हिलस्टेशन आहे. जून्या नाशिक रस्त्यावरून हे ठिकाण दिसते. तेथून डोंगरावर जाणारा रोपवे तयार केला किंवा पायर्‍या बांधल्या तर या परिसरांत पर्यटकांची गर्दी वाढेल.

३८. गणेश लेणी : खुलताबाद येथील मलिक अंबर कबरी जवळ प्रसिद्ध विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाजवळून एक वाट कैलास लेण्याच्या मागच्या बाजूला निघते. इथे फारसे ज्ञात नसलेले गणेश लेणे आहे. हा परिसर झरे, धबधब्यांनी अतिशय सुंदर असा बनलेला आहे.

३९. मालोजी राजे समाधी : वेरूळला घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी समोर शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांची अतिक्रमाणाने वेढलेली सुंदर समाधी आहे. मंदिराच्या संरक्षक भिंतीला लागून मोकळ्या जागेत एक रिकामी कबर आहे. इथून जवळच जनार्दन स्वामी आश्रम परिसरांत एक राजस्थानी शैलीची अप्रतिम दगडी दोन मजली छत्री (समाधी) आहे.

४०. अहिल्या बाईची बारव : अहिल्या बाईंनी उभारलेली एक अप्रतिम बारव घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळच आहे. बारव चौरस आकाराची असून तिला चारही बाजूंनी पायर्‍या आहेत. बारवेत आठ छोटी मंदिरं असून लाल दगडांतील हे बांधकाम फार वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

४१. मोमबत्ती तलाव व तीन कबरी : हिरण्य रिसोर्ट जवळ तीन कबरी आहेत. हिरण्य जवळचे तळेही खुप सुंदर आहे. त्या परिसराला भेट देताना या कबरीही जरूर पहा.

४२. कडेठाणची महालक्ष्मी : औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडून उजव्या बाजूला कडेठाणकडे जाणारा रस्ता लागतो. या गावातील महामक्ष्मीचे मंदिर शिवकालीन बांधकाम असलेले अतिशय छान आहे.

४३. जामखेड शिवमंदिर : औरंगाबाद पासून बीड रस्त्याला जाताना अडूळच्या जरा पुढे जामखेडची पाटी लागते. या गावात 12 व्या शतकांतील सुंदर असे प्राचीन महादेव मंदिर आहे. मंदिराचा जिर्णाद्धार गावकर्‍यांनी केला असून परिसर छान ठेवला आहे.

४४. जांबुवंत मंदिर : याच जामखेडला जांबुवंताचे एक मंदिर डोंगरावर आहे. हा परिसर निसर्गरम्य असा आहे.

४५. रोहिला गड : औरंगाबाद बीड रस्त्यावर जामखेडच्या अलीकडेच रोहिला गडची पाटी लागते. हा जूना किल्ला असून आता फक्त काही अवशेषच शिल्लक आहेत. डोंगरावरचे ठिकाण म्हणून रम्य.

४६. त्वरीता देवी : गेवराईच्या अलीकडे डाव्या बाजूला तलवाडा गावाकडे एक रस्ता जातो. इथे डोंगरावर त्वरीता देवीचे शिवकालीन मंदिर आहे. ही देवी म्हणजे विष्णुची शक्ती रूपात पुजा केली जाते अशी एकमेव आहे. मंदिर परिसरांतील दिपमाळा सुंदर आहेत. गावकर्‍यांनी मंदिर अतिशय चांगले ठेवले आहे.

७. शहामुनीची समाधी : गोदावरीच्या काठावर शहागड म्हणून जे गांव आहे त्या गावात महानुभाव संत शाहमुनी यांची समाधी आहे. समाधी अगदी गोदावरीच्या काठावर असून ही समाधी म्हणजे जून्या किल्ल्याचाच एक भाग आहे. समाधी जवळ प्राचीन जूना भव्य दरवाजा आहे. बाकी किल्ल्याचा बहुतांश भाग पडला आहे.

४८. दाक्षायणी देवी : लासुरची दाक्षायणी देवी हे नदीकाठी असलेले एक प्रेक्षणीय असे स्थळ आहे. याच गावात गणपतीचे शेत म्हणून एक ठिकाण असून तिथे उघड्यावर गणपतीचे मुर्ती आहे.

४९. रावणेश्वर मंदिर : शिवूर मध्ये एक रावणेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तर यादव काळातील आहे.

५०. जटवाडा : जटवाडा इथे जैन मंदिर आहे. शिवाय इथून एक वाट दौलताबादपाशी निघते. आता समृद्धी मार्गासाठी काम इथे चालू आहे. हा घाट सुंदर आहे.

५१. एकलरा देवी : औरंगाबाद करमाड रस्त्यावर उजवीकडे वळल्यावर हे सुंदर ठिकाण आहे.

५२. सातारा डोंगरातील पठारावर असलेले खंडोबा मंदिर.

५३. चिंचखेड खंडोबा मंदिर : पाचोड अंबड रस्त्यावर हे पुरातन खंडोबा मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार गावकर्‍यांनी चांगला केला असून मंदिराचे सुंदर दगडी खांब, सभागृह शाबूत आहे. बाह्यभाग नव्याने बांधण्यात आला आहे.

श्रीकांत उमरीकर,
औरंगाबाद 9422878575

===============

फिरायला जायचंय पण गाडी चालवण्यासाठी ड्राईव्हर नाही? काळजी करू नका
आपल्या परिसरातील कार ड्राईव्हर्स शोधण्यासाठी DriversFind.in वेबसाईट ला भेट द्या

Leave a Reply